( रत्नागिरी )
राष्ट्रीय आरोग्य मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णवाहिकांवर कंत्राटी वाहनचालकांची नियुक्ती केली जाते. रुग्णवाहिका चालक चार महिन्यांपासून मानधनाविनाच सेवा पुरवित आहेत. मात्र, ३० जूनपर्यंत मानधन जमा न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका पुरविण्यात आल्या आहेत. यात १०२ क्रमांकाची सेवेचा समावेश आहे. या क्रमांकावर संपर्क करणाऱ्या गरोदर मातांना रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जाते. तसेच या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून इतर रुग्णांची ने-आण केली जाते. रुग्णवाहिकांच्या चालकांचे कर्तव्याचे नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राट कंपनीच्या माध्यमातून होत आहे. नव्यानव्या कंत्राटदारांना ठेका देण्यात येतो. मात्र, रुग्णवाहिका चालकांची सेवा कायम ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीतही कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णवाहिका चालकांनी जीवाची पर्वा न करता सेवा पुरविली होती. तुटपुंज्या मानधनातून रुग्णवाहिका चालक कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अशात चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकटासह अनेक समस्या निर्माण झाले आहे.
यापूर्वीही काम बंद
मागील आठवड्यात रुग्णवाहिका चालकांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पुन्हा काम सुरू केले होते; पण अद्यापही मानधन न मिळाल्याने चालकांनी पुन्हा काम बंदचा इशारा दिला आहे. आतातरी प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे.