(रत्नागिरी)
पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात अटकेत असलेला पंढरीनाथ आंबेरकर याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही जप्त केलेली गाडी परत करावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. ही मागणी सत्र न्यायालयाने मान्य केली असून, १७ लाख रुपयांचे बंधपत्र घेऊन गाडी द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कशेळी (ता. राजापूर) येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खूनप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची थार ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही गाडी पोलिस स्थानकात पडून आहे. या गाडीचे टायर, इंजिन, बॅटरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी ही गाडी आवश्यक आहे. ही गाडी परत मिळावी, अशी मागणी आंबेरकर याने केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मल्लिकार्जुन आंबळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. नंतर हा अर्ज मंजूर करण्यात आला.