(खेड / प्रतिनिधी)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजही ग्रामीण भागांमध्ये मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेली गाव आहेत. एकविसाव्या शतकात आपण पदार्पण केले, देश प्रगतीपथावर असल्याचे बोलले जात आहे. देश विश्वगुरू होण्याच्या दिशेने काम करत असल्याचेही सातत्याने बोलले जात आहे. मात्र खऱ्या अर्थाने आजही श्रीमंत गरीब, छोटा मोठा, गाव शहर यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. नुकताच 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील ग्रामीण भागात सोयी सुविधांचा असलेला अभाव आणि त्यांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रस्ता नसल्याने अपघातात ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह पायी नातेवाइकांसह कुटुंबीय घेऊन जात असतानाचा हृदय हेलावणारा व्हिडिओ खेडमधून समोर आला आहे.
खेड तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या २१ वर्षे प्रदीप ढेबे या दुचाकी स्वाराचा मृतदेह रस्त्या अभावी ग्रामस्थांनी तब्बल दीड किलोमीटर पायी प्रवास करून मृतदेह हाती घेऊन जावा लागल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मरणानंतर देखीलही या गावातील नागरिकांच्या मरण यातना संपत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. प्रदीप प्रकाश ढेबे वय २१ (वावे-धनगर वाडी ) या दुचाकीस्वाराचा गुरूवारी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
हा अपघात गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेनजीक घडला होता. दुचाकीवरील प्रदीप ढेबे हा तळे-देऊळवाडी येथून खेडच्या दिशेने येत होता. याचदरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रदीप रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर जावून आदळला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रदिपला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका करण्यात आली परंतु ही रुग्णवाहिका किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी या ठिकाणी येऊन थांबली. त्यापुढील मार्ग पूर्णतः खराब असल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नसल्याने अखेर ग्रामस्थांनी मृतदेह झोळीमध्ये घेतला. तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत मृत्युदेह वाडीमध्ये नेण्याची वेळ येथील नागरिकांना आली.
लोकं आजही संविधानिक अधिकारापासून वंचित
खेड दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम निवडून आले आहेत. सध्या ते सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील आहेत. मात्र त्यांच्याच मतदासंघात दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे, ही शोकांतिका आहे. शहरापासून कोसो दूर असणाऱ्या लोकांना आजही संविधानिक अधिकारापासून वंचित राहावे लागत असेल तर महाराष्ट्राची वाटचाल विकासाकडे की अधोगतीकडे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने विकासापासून दूर असणाऱ्या वाड्या-वस्त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
रस्त्यासाठी ‘न्याय’ मागावा लागतोय
रस्त्या अभावी येथील ग्रामस्थांना नेहमीच पायपीट करावी लागत आहे. मागील दोन वर्षापासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र ग्रामस्थांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडलेले आहे. मात्र येथील नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ही रस्त्यासाठी न्याय मागावा लागत आहे.
आठ दिवसांपूर्वी ही घडली अशीच घटना…
प्रदिपच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. आठ दिवसांपूर्वीही याच गावातील एका महिलेला सर्पदंश झाला. त्या महिलेला स्थानिकांच्या मदतीने अशाच प्रकारे उचलून झोळीमधून कळकरायवाडी या ठिकाणी आणावे लागले. तिथून तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी ते धनगरवाडी तसेच वावे तर्फे नातू गायकर वाडी ते ढेबेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांकडून केली जात आहे.