(रत्नागिरी)
विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी येथे मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित केले आहे. या फेडरेशनमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ५५ विविध संस्था सभासद झालेल्या असून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील संस्थांचाही यात समावेश आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक मराठा मंडळ, रत्नागिरी आणि क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी आहेत.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हितवर्धन करणे आणि त्याचबरोबर आपले क्षात्रतेज व संस्कृती जपत समाजातील तरूणाईला उच्च विद्यार्जनाकडे तसेच व्यवसाय, उद्योगाकडे वळवून आर्थिकदृष्ट्या आपली भावी पिढी सक्षम बनविणे यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करीत असते. यासाठी मराठा समाजानेही एकजुटीने व मनापासून या प्रयत्नाना साथ देण्याची गरज आहे. हा विचार मराठा समाजात रूजविण्यासाठी आणि मराठा समाजात ऐक्य घडवून आणण्यासाठी फेडरेशनने प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची महासंमेलने भरवण्यात येणार आहेत. या वेळी त्याचा मान रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे.
हॉटेल विवेक येथे पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता उद्घाटन, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उच्च विद्यार्जन आणि उद्योग व्यवसायासंबंधी आणि महिलोपयोगी चर्चासत्रे आणि मार्गदर्शन व पुरस्कार वितरणाचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो मराठा बंधू-भगिनी या संमेलनासाठी येणार आहेत. गावागावांतील मराठा मंडळ सहभागी करून घेण्यात येत आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने अखिल मराठा फेडरेशनची ओळख व्हावी आणि संपूर्ण मराठा समाज जोडला जावा हा मुख्य हेतू आहे. अखिल मराठा फेडरेशनची स्थापना २०१५ मध्ये स्व. आप्पासाहेब पवार यांनी केली. मराठा समाजासाठी विविध भागात काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी समाजकार्य करणाऱ्या मराठा संस्थांना त्यांनी एकत्र करून फेडरेशन तयार केले. शासन दरबारी मराठा समाजाच्या मागण्या मांडता येतील आणि त्यातून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय आपणाला मंजूर करून घेता येऊ शकतील ही त्या मागची मूळ संकल्पना आहे.
सद्यस्थितीत मराठा समाजाची तुलनात्मकदृष्ट्या वेगाने पिछेहाट होत आहे. त्यासाठी मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे, असा दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हावा तसेच समाजामध्ये स्वाभिमान जागृत करून समाजाला स्वावलंबी बनवून आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आणण्यासाठी आपल्या मराठा समाजाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. ही प्रेरणा घेऊन समाजाला परिवर्तनवादी दिशा दाखवताना आपला धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा यांचा वारसा जपत डोळसपणे समाजाने पुढे वाटचाल केली पाहिजे.
‘मराठा तितुका मेळवावा’ या उक्तीने ‘मराठा जोडो’ हे अभियान राबविताना विविध रचनात्मक उपक्रम व चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील व तळागाळातील मराठा समाज संघटित करण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने अखिल मराठा फेडरेशनच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जोडले जाण्यासाठी ९८२२७०६९२३ / ८८०५५२०३०० येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.