(नवी दिल्ली)
काँग्रेस पक्षाने आज केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी ही माहिती दिलीय. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते अजय माकन यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर पक्षाची खाती गोठवली असल्याचा आरोप केला. याविषयी बोलताना माकन यांनी, ‘काल आम्हाला युवक काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती मिळाली. काँग्रेस पक्षाची खातीही जप्त करण्यात आली आहेत, असे म्हटले.
पुढे त्यांनी, आयकराने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी विरोधी पक्षांची खाती गोठवली जातात, तेव्हा ते लोकशाही गोठवण्यासारखे असते, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केली. 2018-19 च्या आयकर रिटर्नच्या आधारे आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसची खाती गोठवली आहेत. तसेच ज्या लोकशाहीत एकच पक्ष आपल्या इच्छेनुसार काम करतो, तिथे असे घडू नये. जिथे प्रमुख विरोधी पक्षाला अशा प्रकारे गौण बनवले आहे. आम्हाला न्यायव्यवस्था आणि जनतेकडून न्याय हवाय. आम्ही आयकर अपील न्यायाधिकरणात याचिका दाखल केलीय तेथे सुनावणी सुरू आहे. सुनावणीपूर्वी खुलासा करणे आम्ही योग्य मानले नाही. काल आम्हाला कळले की आमचे वकील विवेक तनखा यांची आणखी 4 खाती गोठवण्यात आली आहेत.
लोकसभेच्या तोंडावर निवडणुकीच्या घोषणेसाठी काही दिवस राहिलेले असताना काँग्रेसची खाती गोठवून सरकारला काय सिद्ध करायचं आहे. काल रात्री युवक काँग्रेसचं खातं देखील गोठवण्यात आलं आहे. आयटीनं २१० कोटींचा परतावा मागितला आहे. हा पैसा धनाढ्य व्यक्तींचा नाहीये. आम्ही जो ऑनलाइन क्राऊंड फंडींगद्वारे जमवला आहे. युवक काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा पैसा आयटीनं, भारत सरकारनं गोठवला आहे. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोखे घटनाबाह्य ठरवले आहेत. भाजप त्याचे पैसे वापरत आहे. म्हणजे देशात लोकशाही कुठं जिवंत आहे, असा सवाल माकन यांनी केला आहे.