(नाशिक)
जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोघांना शिक्षेसोबतच प्रत्येकी ५० हजार दंड देखील भरावा लागणार आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालाविरोधात मंत्री कोकाटे उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवू शकतात.
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
माझ्या राजीनाम्याचीही मागणी होऊ शकते
नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर माध्यमांशी बोलतांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की,”रितसर निकाल लागलेला असून ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. १९९५ सालचे हे प्रकरण असून या प्रकरणाचा निकाल उशिरा लागला आहे. त्यामुळे मी आता वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्याने या प्रकरणावर मी फार काही बोलणार नाही”, असे त्यांनी सांगितले.