(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यात वारंवार चर्चेत असणारा वाटद ग्रामपंचायतमधील स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय घोटाळा. या घोटाळ्याच्या चौकशीवेळी शौचालय लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर १२ हजार रुपये शासनाकडून मदत मिळत आहे. परंतु ग्रामपंचायतच्या हलगर्जीमुळे शौचालयापासून वंचित लाभार्थी व आताच्या महागाईनुसार मदत मिळावी अशी मागणी करून ग्रामपंचायतमधून ३ हजार रु. देण्यात यावेत अशी लाभार्थ्यांच्या हिताची मागणी आरटीआय महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख निलेश रहाटे यांनी केली होती. या मागणीबाबत रहाटे यांच्याकडून दि ३०-८-२०२३ रोजीपासून सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता.
महागाईनुसार मदत मिळावी याबाबत २६ जानेवारी २०२४ रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थाकडून संमती मिळून देखील सरपंच श्री अमित वाडकर यांनी सांगून सुद्धा ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक मा. श्री रमेश डडमल अनुदान लाभार्थ्यांना देण्यासाठी टाळाटाळ करत होते. ७ महिने उलटून सुद्धा तसेच शौचालय पूर्ण बांधून सुद्धा लाभार्थ्यांना ग्रामपंचायत व पंचायत समिती रत्नागिरी मधून मदत मिळत नव्हती. त्यामुळे लाभार्थ्यांना आपण शौचालय बांधून मोठी चूक केली का? असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत होता.
परंतु त्यानंतर सरकारी काम आणि ६ महिने थांब या म्हणीची आठवण झाली. दि. २२-७-२४ रोजी संबंधित विभाग व ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्यांना मदत मिळवून देण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी खंडाळा बस स्टॅन्ड वर भीक मागो आंदोलन करून दिवसभर जमा होणारी रक्कम ही लाभार्थ्यांना वाटप करण्याचे ठरविले होते. या आंदोलनाचे नीलेश रहाटे यांनी पत्रक देताच ग्रामपंचायतीला जाग आली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तत्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. दरम्यान तक्रारदार रहाटे यांनी ६-८-२०२४ रोजीचे होणारे आंदोलन स्थगित केले.
याबाबत रत्नागिरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री जे.पी जाधव यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना १२ हजार अनुदान देण्याबाबत आता निधी उपलब्ध नसल्याने वाटप करू शकलो नाही परंतु निधी प्राप्त झाल्यावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम तात्काळ जमा केली जाईल.