(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर पासून काही की.मी अंतरावर डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मुजीब सोलकर (कुरधुंडा )वय वर्ष 50 यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने तेथून सुसाट वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतली. व वातावरण तणावपूर्ण झाला.
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथे राष्ट्रीय महामार्गालगत मुजीब सोलकर हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला उभी करून उभे असताना आंबेडच्या दिशेने सुसाट वेगात येणाऱ्या डंपर (डंपरवर नंबर दिसत नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाल्याने ) डंपर चा नंबर समजू शकला नाही. डंपर चालक शिवनारायण दुडू हा संगमेश्वर च्या दिशेने जात असताना रस्त्याच्या बाहेर उभ्या असलेल्या मुजीब सोलकर यांना जोरदार धडक देऊन सुसाट वेगात संगमेश्वर च्या दिशेने पळून गेला. अशी तेथे उपस्थिती असलेल्यामधून बोलले जात होते. तेथील काही उपस्थितांनी अपघात करून पळून जाणाऱ्या डंपर चा पाठलाग केला मात्र तॊ भेटू शकला नाही. तसेच डंपरवरचा नंबरही दिसून येत नव्हता त्यामुळे त्याचा माग काढणे सुद्धा पाठलाग करणाऱ्या लोकांना कठीण झाले.
अपघाताची माहिती कुरधुंडा तसेच आजूबाजूच्या गावांत हा – हा म्हणता पसरली आणि काही वेळातच येथे लोकांची प्रचंड गर्दी झाली. संगमेश्वर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त डंपर हा राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीचा असल्याचे काहींनी सांगितल्याने व तशी चर्चासुद्धा अपघातस्थळी होती. त्यामुळे याची माहिती जे. एम. म्हात्रे कंपनीच्या संगमेश्वर येथील साईड इंचार्ज यांना देण्यात आली, परंतु ते घटनास्थळी बराच वेळ झाला तरी न आल्याने जमाव आक्रमक झाला.
अपघातस्थळी तणावपूर्ण वातावरण
दुपारी एक च्या सुमारास अपघात होऊन नाहक एका व्यक्तीचा बळी गेला, ही दुर्दैवी घटना असताना याची माहिती जे. एम. म्हात्रे च्या संगमेश्वर येथे असलेल्या कार्यालयातील सबंधिताना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी याची कोणतीच दखल न घेतल्याने तसेच अपघातस्थळी येण्याचे सुद्धा औदार्य न दाखवल्याने उपस्थित जमाव चांगलाच आक्रमक झाला. आणि त्यामुळे आणखी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आक्रमक धारण केलेल्या लोकांना समजावण्याचा पर्यंत करूनही तॊ निष्फल ठरला.
अखेर राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून
सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अपघात घडला तीन तास उलटून गेले एका बाजूला आक्रमक झालेले लोक तर रस्त्याच्या बाजूला मृतदेह अशी परिस्थिती असताना कंपनीचे कोणीही अधिकारी अपघातस्थळी न आल्याने आक्रमक झालेल्या शेकडो लोकांनी अखेर राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. आणि मुंबई तसेच गोवा च्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सबंधिताना हजर केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही
डंपर चालक तसेच कंपनीचे सबंधित घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याच्या मतावर ठाम होते. तसेच रस्त्यातून हटणार नाही असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. लोक कमालीचे संतप्त झाले होते. साडेतीन तास उलटून गेले ना डंपर चालक ना कंपनीचे सबंधित अपघातस्थळी आले. मात्र यात रस्ता रोको केल्याने दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागून त्या वाढत जात होत्या. अखेर संगमेश्वर पोलिसांनी लोकांना समजावून शांत केल्याने रोखून धरलेला रस्ता खुला केला.
चार तासानंतर मृतदेह अपघातस्थळावरून उचलला
पोलिसांच्या मध्यस्तीने वातावरण शांत झाले. व मृतदेह संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. या वेळी रुग्णालय परिसरात सुद्धा प्रचंड गर्दी होती. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांची कार्यवाई सुरु होती.