(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील भात, नाचणी, वरी या पिकांना फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. केवळ पंचनामे न करता तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी भीम आर्मीच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकांची लागवड झाली. शेतकरी हातातोंडाशी आलेला घास सतत कोसळत असलेल्या पाऊस हिरावून घेतो की काय अशी स्थिती ओढावली आहे. कोकणातील शेतकरी संकटात सापडला तरीही आत्महत्या सारखी मोठी पावले उचलत नाही. परंतु रत्नागिरी जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहे की नाही? असा सवाल भीम आर्मी कोकण प्रदेशाध्यक्ष प्रितेश पवार यांनी उपस्थित करत तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, केवळ पंचनामे कागदावर न ठेवता तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भीम आर्मी कोकण प्रदेशाध्यक्ष पवार यांनी माध्यमांद्वारे केली आहे.
ते पुढे म्हणाले, एकीकडे भात, नाचणी, वरी पिकांवर अन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडली असतानाच आता पावसानेही नुकसान केले आहे. परतीच्या पावसाच्या सरी अजूनही सुरू असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असून शेतामध्ये तळी साचल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. अचानक वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसामुळे भात, नाचणी पिकं जमिनीवर आडवी पडली आहेत. भातपिक बहरले असतानाच शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. भात पाण्यात कुजत असून, दाणे गळून पडू लागले आहेत. कोकणातील शेतकरी नुकसानीत जाऊ नये यासाठी प्रशासनाने तत्काळ नुकसान भरपाई संदर्भात कार्यवाही सुरू करावी, अशीही विनंतीपूर्वक मागणी भीम आर्मी कोकण प्रदेशाध्यक्ष पवार यांनी प्रशासनाकडे माध्यमांद्वारे केली आहे.