(मुंबई)
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी – विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही बाजूनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित येतील असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठका सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्रित येणार आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बहुजन समाजाने आणि मुस्लिम समाजाने त्यांना मतदान करू नये. तर येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील असे वक्तव्य हे प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय होते वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंचे वक्तव्यं?
भाजप आणि ठाकरे गटामध्ये सध्या गुप्त पद्धतीने बोलणी सुरू असल्याचे समजते आहे. २५ जुलै रोजी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी राज्यातील भाजप नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असा दावा मोकळे यांनी केला होता.
देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटे मातोश्री बंगल्यावर गेले. त्या ठिकाणी तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत कोण होते? त्यांनी कोणाच्या गाठीभेटी घेतल्या. या बैठकीत काय ठरले? ते सगळे उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्पष्टपणे सांगितले पाहिजे, असे मोकळे म्हणाले होते.