• “अन् पालकमंत्र्यांनी ट्रस्ट स्थापन करायला सांगितली….” वाक्याने खळबळ
( रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी )
तालुक्यातील समस्त बौद्ध समाज बांधवांची महत्वपूर्ण सभा थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास समिती ट्रस्टच्या वतीने मंगळवारी दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. संघटनेमार्फत तालुक्यातील काही गाव शाखा वगळून इतर गाव शाखांना पत्रव्यवहार करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम बौद्ध समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवत त्यांच्या प्रश्नांनी बैठक गाजली. बैठक सुरू होण्यापूर्वी बौद्ध बांधवांकडून भारतीय बोद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्याभूमीचे शिल्पकार सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्मुतिदिनी विनम्र आभिवादन करण्यात आले.
काही दिवसापापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. आंबेडकरवाडी येथील थिबा राजाच्या प्रार्थनास्थळी बौद्ध मूर्ती ठेवलेली आहे. या उत्पादन शुल्कच्या जमिनीवर जवळजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन जवळजवळ चाळीस वर्षापासून नेत्यांनी केलेल्या बौद्ध विहाराच्या मागणीबाबत तेथील विहारासाठी साडेसात कोटीं रुपयांची घोषणा करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे असे मंत्री सामंत यांच्याकडून सांगण्यात आले. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत साडेसात कोटीं रुपयांची घोषणा केल्यानंतर बौद्ध समाजात एकच खळबळ उडाली. स्थापन केलेल्या ट्रस्टसह पालकमंत्र्यांसह बौद्ध समाज बांधवांनी अनेक प्रश्न उपस्थित केले यातून बौद्ध समाजाची विरोधाची भूमिका असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र याच बौद्ध विहार उभारण्याच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या ट्रस्टच्या वतीने विचार विनिमय करण्यासंदर्भात मंगळवारी (दिनांक १७ सप्टेंबर २०२४) शिवाजी नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठीकाला बौद्ध समाजांत खदखदणारा असंतोष मांडण्यासाठी गावातून आलेल्या बौद्ध बांधवांकडून सभागृह तुडुंब गर्दीने खचाखच भरले होते. या तुडुंब भरलेल्या सभागृहाच्या गर्दीच्या छातीत तेव्हढ्याच रोषही भरलेला होता. ज्या रोषाला सामोरे जाताना थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास समिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. यावेळी संबंधित ट्रस्टचे विश्वस्त मंडळ हे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कलाने, प्रभावाखाली कामं करत असून पालकमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी समाजाची घोर फसवणूक करीत आहे असे धडधडीत तोंडावर सुनावण्यात उपस्थितांनी धमक दाखवली. तेंव्हा आपल्या या लांगूलचालन भुमीकेचे समर्थन करताना पदाधिकाऱ्यांना तारेवरची केवीळवाणी धडपड करावी लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र उभारण्यात येणारी वास्तू कशा स्वरूपाची असणार आहे याचा व्हिडिओ व्हायरल होत असून यावर बौद्धविहार आणि म्युजीयम असे दोन्ही शब्द असल्याने नेमंक काय उभारणार हाच प्रश्न जिल्ह्यातील बौद्ध बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.
पावस विभागासह थिबा राजा प्रार्थनास्थळाच्या हाकेवर असणाऱ्या आंबेडकरवाडीला देखील विश्वासात न घेतल्याने उपस्थित सभासदानी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसमोर सडेतोड प्रश्न उपस्थित केले. इतर उपस्थित बांधवांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी शासनाने मंजूर केलेली साडेसतरा गुंठे जमीन ही बौद्ध समाज निर्माण ट्रस्टच्या नावे हस्तांतरण झालेली नाही. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे जमीन हस्तांतरण झालेली आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२४ चा भुमी पुजनाचा कार्यक्रम शासकीय आयोजित कार्यक्रम आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर उपस्थितांनी समाजाला अंधारात ठेवले जात आहे याची कबूलीच पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे दिली. यावेळेला ट्रस्टच्या इतरही सदस्यांनी फक्त समाजालाच नाही.तर आंम्हाला सुध्दा अंधारात ठेवून काही पदाधिकारी हे ‘हम करे सो कायदा’ या पध्दतीने काम करीत असल्याचा थेट आरोप तेथील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर केला. हा आरोप करण्यात ट्रस्टच्या सदस्यांत चढाओढ लागल्याचेही दिसून आले. आणि ही सभागृहातील बिघडत चाललेली परिस्थिती हाताळताना ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार यांची असाहयता ही स्पष्टपणे दिसून येत होती. यावेळी अनेकदा त्यांचे स्वतः वरचे नियंत्रण सुटल्याचे दिसले. तर ट्रस्टने तेरा महिन्यात गतिमान केलेला कारभार उघड झाल्यावर ट्रस्टमधील पालकमंत्र्यांच्या जवळ असणारे काही ठरावीक पदाधिकारी हे अध्यक्षांच्या बचावाला पुढे सरसावले, त्यांना देखील उपस्थित बांधवांनी तातडीने खाली बसवले. अनेक प्रश्न, त्यावर उत्तरे नाही अशी काहीशी स्थिती निर्माण झाली. या बैठकीला अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष मारुती कांबळे, उपाध्यक्ष भगवान जाधव, सचिव विजय मोहिते, सहसचिव सुहास कांबळे, सहसचिव तुषार जाधव, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष प्रीतम आयरे, सल्लागार ॲड. शिवराज जाधव , मंगेश सावंत आदी कार्यकारणीतील सदस्यांसह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्नांची उत्तरे न देताच बैठक घेतली आटोपती
शासनाकडून जमीन मंजूर करण्यात आलेली आहे. जागेची मोजणी ही सन २०१४ सालीच झाल्याची पदाधिकाऱ्यांची कबुली ही त्यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली. कारण ट्रस्टची निर्मितीच मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे पदाधिकाऱ्याने उपस्थितांसमोर कबुली दिल्याने संतप्त सभासदांच्या आरोपांना एक प्रकारची पुष्टीच मिळाली. आणि ट्रस्टचे पदाधिकारी हे समाजाच्या नावांवर केवळ मंत्री महोदयांच्या आदेशाचे पालन करण्याचे काम करीत असून समाजाला फसवत आहेत हे त्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यातून सिध्द झाले. मात्र तरीही पालक मंत्री महोदयांची मर्जी संपादन करण्याचे काम करीत असून आणि त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागणार याची जाणीव असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी आपल्या अधिकाराचा वापर करून २३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासकीय कार्यक्रमाला समाजाने उपस्थित राहण्याचा फतवा काढला. ज्याला उपस्थितांमधून कडाडून विरोध केला गेला. जो अध्यक्षिय अधिकाराखाली दाबून टाकण्यात आला. तसेच समाज बांधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच वेळेचं कारण दाखवून सभा आटोपती घेतली. यामुळे उपस्थितांसह समाजांत तिव्र नाराजी आणि संतापाची लाट पसरली आहे.
पदाधिकाऱ्यांमध्येच ताळमेळ बसेना….
विचार विनिमयाची बैठक सुरू असताना स्टेजवरील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडून बोलूच दिले जात नव्हते. यातून एका सदस्याने थेट स्टेजवरून सांगितले की, सुरू असलेल्या कामकाजात आम्हाला कोणत्याही पद्धतीने विश्वासात घेतले जात नाही. अशा शब्दात उघड उघड सांगितल्यानंतर सल्लागार पदावर असणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने बोलण्याची हिम्मत दाखवली मात्र अध्यक्षांकडून बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली. यावेळी अध्यक्षांबरोबर त्या पदाधिकाऱ्याची शाब्दिक चकमक झाली. बोलायला मिळत नसेल तर आम्ही समोर बसतो असे सांगून पदाधिकाऱ्याला आपल्या खुर्चीत पुन्हा बसावे लागले. त्यानंतर पुन्हा त्या पदाधिकाऱ्याने अध्यक्षांची परवानगी घेतली अन् सांगितले की, हे सर्व पालकमंत्र्यांच्या संबंधातून घडतेय हे आपल्या सर्वांनाच दिसत आहे. मात्र ही ट्रस्ट स्थापन करण्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यातून उपस्थित बौद्ध बांधवांकडून प्रचंड रोषांच वातावरण निर्माण झाले. एका सदस्याला तर उपस्थित बांधवांसह स्टेजवरील पदाधिकाऱ्यांनीही बोलू दिले नाही. त्यामुळे त्या सदस्याने थेट राजीनामा घ्या असे सांगितले आहे.यातून ट्रस्टमध्येच ताळमेळ नसल्याचे समोर आले असून यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.