(फुणगूस / एजाज पटेल)
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ताडपांगरी ता. जि. परभणी या शाळेतील मुलांची शैक्षणिक सहल घेवुन जाणारी एसटी बस क्रमांक MH13CU / 7829 आणि वॅगनार क्रमांक MH05FB/3489 या दोन गाड्यांचा अपघात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गांवरील फुणगूस भोसलेवाडी या ठिकाणी असलेल्या तीव्र उतारवरील वळणावर अपघात झाला. गाडीच्या नुकसानीव्यतिरिक्त दोन्ही गाड्यांमधील कोणालाही इजा झाली नाही. ही घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडपांगरी जिल्हा परभणी या शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल 3 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच गणपतीपुळे येथे जाण्यासाठी परभणी डेपोच्या MH13CU/7829 एसटी बसने निघाली या एसटी बसवर चालक म्हणुन सतीश मुरलीधरराव शेळके (राहणार तरोडा ता. जि. परभणी) हे होते. कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील देवर्शन झाल्यावर गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी गणपतीपुळे येथे सहलीची बस आली. या ठिकाणी रात्री मुक्काम करून शुक्रवारी गणपतीपुळे येथून जाकादेवी -फुणगूस मार्गे परतीच्या मार्गांवर एसटी बस जात असताना फुणगूस भोसलेवाडी येथील अवघड वळणाच्या उतारावर एसटी बस असताना वॅगनार क्रमांक MH05FB/3489 चा चालक सिद्धेश रामा भोईर (वय 35 वर्षे, रा. गावदेवी मंदिर सापाडगांव, कल्याण वेस्ट जि.ठाणे ) हा सुसाट वेगाने येऊन त्याच्या पुढील गाडीला मागे टाकण्याच्या नादात विरुद्ध दिशेला जात समोरून येणाऱ्या सहलीच्या गाडीला जोरदार धडकला.
ही धडक एवढी जोरदार होती की एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेली. तर वॅगनार सुद्धा रस्ता सोडून बाजूच्या गटारात पलटी झाली. सुदैव एवढेच की दोन्ही गाड्यातील कोणालाही इजा झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घडलेल्या अपघाताची माहिती एसटी बस चालक सतीश शेळके यांनी नजिकच्या डिंगणी पोलीस दूरक्षेत्रात दिली. ही माहिती मिळताच सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे म्हस्कर यांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर पंदेरे करत आहेत.