(चिपळूण)
मुंबई गोवा हायवेवर परशूराम घाटामध्ये झालेल्या अपघातामध्ये २१ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकापेक्षा अधिक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. बस, कार, ट्रेलर, ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बराच वेळ परशूराम घाटामध्ये वाहतूक व्यवस्था दोन तास विस्कळित झाली होती. हा अपघात मंगळवारी 3 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजता झाला आहे. सध्या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
ट्रेलर चालक हा मुंबईच्या दिशेने चालला होता. यावेळी त्याचा ट्रेलरवरील ताबा सुटल्याने त्याने प्रथम आयशर टेम्पोला धडक दिली. यामध्ये टेम्पो पलटी झाला. त्यानंतर पुढे असलेल्या घरडा कंपनीच्या बसलाही धडक दिली. बस संरक्षक भिंतीवर आदळली. यानंतर बसमागे असलेली कार आणि ट्रकही एकमेकांवर आदळले. असा एकूण ५ वाहनाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात ज्या बसला अपघात झाला ती घरडा कंपनीची होती. त्या बसमधील १७ कामगार जखमी झाले. या चार वाहनांच्या अपघातात कार मधील मनोज महादेव मांजरेकर आणि अन्य एक प्रवासी असे दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले. या सगळ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परशुराम घाटात या ठिकाणी अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे.
या अपघातात घरडा कंपनीच्या बसमध्ये असणाऱ्या कामगारांना किरकोळ दुखापती झाल्या. त्यातील एकाला शहरातील खासगी रूग्णालयात, तर उर्वरीत १६ जणांना घरडा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांवर उपचार करून नंतर सोडून देण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतुकीचा प्रश्न एरणीवर आहे.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलांद मेंगडे यांयासह पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच्या प्रयत्नातून नंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.