(चिपळूण)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळणच्या बहादूरशेख येथील काही महिन्यांपूर्वी दुर्घटनाग्रस्त झालेल्या उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एक दुर्घटना घडली, कोसळलेल्या उड्डाणपुलाचा पिलरचा भाग तोडत असताना क्रेनचा रोप वे तुटून तीन कामगार जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिराने ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूणच्या बहादूरशेख येथील उड्डाणपुलाचा भाग कोसळला होता. त्यानंतर केंद्रस्तरावरून पाठवण्यात आलेल्या तत्ज्ञांच्या समितीने सुचवल्यानुसार या उड्डाण पुलाचे नवीन डिझाईन तयार करून त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान कोसळलेल्या उड्डाण पुलाचा भाग असलेल्या पिलरचा भाग शुक्रवारी तोडण्याचे काम सुरू होते. क्रेनच्या सहाय्याने तोडलेला पिलरचा भाग खाली आणला जात असतानाच अचानक क्रेनचा रोप-वे तुटला. यामुळे तीन कामगार तुटलेल्या रोपवेवरच लटकून पडले. यातीन एकजण खाली कोसळल्याने जखमी झाला. या दुर्घटनेत एकूण तीन कामगार जखमी झाले आहेत. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.