(रत्नागिरी)
हॉस्पिटलला गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवून रुग्णांना देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टरला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या घटनेचा अद्यापही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डॉ. अनंत नारायण शिगवण (६७, रा. टीआरपी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
‘साई हॉस्पिटल’ येथे आरोग्य विभागाने पोलिसांच्या सहाय्याने छापा टाकून शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारवाई केली होती. डॉक्टरांकडे वैद्यकीय गर्भपात कायदा सन १९७१ व २०२३ मध्ये नमूद आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता व अनुभव नाही. तसेच हॉस्पिटलला गर्भपात केंद्राची मान्यता नसतानाही हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य ठेवल्याचे आढळले.
याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्या डॉक्टरांना रक्तदाबाचा त्रास वाढू लागल्याने रात्री त्यांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
याप्रकरणी आता पोलिसांनी डॉक्टरांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे.