(रत्नागिरी)
बहिणीशी प्रेमसंबंध असणाऱ्या तरुणाला त्याबाबत विचारणा करणाऱ्या तिच्या भावाला प्रियकर, त्याचे वडील आणि अन्य दोघांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (८ एप्रिल) दुपारी रत्नागिरी शहरातील टिळक आळी येथे घडला. याप्रकरणी प्रियकर, त्याचे वडील व अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बासिद मेहताब साखरकर, मेहताब साखरकर (दोन्ही रा. अकबर मोहल्ला साखरतर, रत्नागिरी) अशी त्यांची नावे असून, अन्य दोन व्यक्ती अज्ञात आहेत. त्यांच्या विरोधात बाणखिंडी शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील तरुणाने सोमवारी रात्री शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. त्याच्या बहिणीचे बासिद साखरकरसोबत गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. २०२३ मध्ये त्याची बहीण घरात कोणालाही न सांगता बासिदसोबत निघून गेली होती. ती दोन ते तीन दिवसांनी घरी परतल्यावर त्या दोघांनाही घेऊन तरुणीचा भाऊ शहर पोलिस स्थानकात गेला होता. त्यावेळी पोलिसांनी बासिदला समज दिली होती.
दरम्यान, फिर्यादीची बहीण चिपळूण येथे नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असताना २८ फेब्रुवारी २०२४ रोजी ती तेथील वसतिगृहामधून कुठेतरी निघून गेली. ही बाब वसतिगृहातील महिला अधिकाऱ्यांनी भावाला सांगितली. ती बासिदसोबतच गेली असल्याचा समज करून त्याने पोलिस स्थानकात तक्रार दिली नव्हती. दरम्यान, सोमवारी बासिद साखरकर हा टिळक आळीत फिर्यादीला दिसला. तेव्हा त्याने आपल्या बहिणीबाबत विचारणा केली. बासिदने शिवीगाळ करत आपले वडील मेहताब यांना फोन करून बोलावून घेतले. मेहताब येताना अन्य दोघांना आपल्या सोबत घेऊन तिथे आला. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीला मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला आहे.