(संगमेश्वर)
देवरुख परिसरातील एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देवरुख पोलिस स्थानकात तीन दिवसांपुर्वी दाखल करण्यात आली होती. तिचा शोध देवरुख पोलिस घेत असताना सदर तरुणीचे लोकेशन रत्नागिरी येथे मिळाल्यानंतर ती एका तरुणासोबत असल्याची माहिती पोलिसांकडुन मिळाली.
देवरूख पोलिसांनी रत्नागिरी येथे जाऊन सदर मुलीला ताब्यात घेऊन देवरुखात आणले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी माझ्या मुलीला रत्नागिरी येथील त्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार देवरुख पोलीस स्थानकात शुक्रवारी दिली आहे. याप्रकरणी या तरुणाला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली आहे.
देवरुख पोलीस स्थानकातुन मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी दि. १२ रोजी देवरूख येथे कॉम्पुटर क्लासला जाते असे सांगून घरातुन बाहेर पडली होती. ती सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्याने ती बेपत्ता असल्याची फीर्याद आईने दिली होती. या दरम्यान, देवरुख पोलीसांनी तपासाची सुत्रे फिरवली. सायबर सेलच्या माध्यमातून सदर तरुणीचे लोकेशन रत्नागिरी येथे मिळाले. त्यानंतर देवरुख पोलीसांनी तिला शुक्रवारी ताब्यात घेऊन देवरुख येथे आणले.
तरुणावर गुन्हा दाखल
शुक्रवारी तरुणीच्या वडीलांनी आपल्या मुलीला रत्नागिरी येथील त्या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून, तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याबाबतची तक्रार देवरुख पोलीस स्थानकात दिली आहे. यानुसार सदर तरुणावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरूणाला रत्नागिरी शहर पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक यशवंत केडगे देवरुखात पोलीस ठाण्यात हजर झाले होते. अधिक तपास देवरुख पोलीस निरीक्षक्त अतुल जाधव करीत आहेत.