(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या चंपक मैदानात बेशुद्धावस्थेत एक तरुणी सापडली आहे. सदर तरुणीला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या अंगावर जखमा आढळल्या असून याबाबत पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. ही तरुणी देवरुख येथील असल्याचे समजते. ही तरुणी सकाळी शहरातील एका खाजगी दवाखान्यामध्ये कामाला येत असताना रस्त्यात मध्ये गाठून चंपक मैदानात येथे आणून अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर तरुणी चंपक मैदान या ठिकाणी कशी गेली व तिच्या अंगावर कसल्या जखमा आहेत याबाबत आता तपास सुरू आहे. या तरुणीला सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणताच लोकांचा रोष अनावर झाला आहे. येथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्तेही एकत्र जमा झाले आहे. सदर घटनेबाबत सर्वांनीच निषेध व्यक्त करत, त्या नराधमाला त्वरीत शोधून काढण्याची मागणी केली आहे.
सदर मुलगी शहरातील एका खाजगी रुग्णालयात ट्रेनी नर्स म्हणून प्रशिक्षण घेत होती. या तरुणीला चंपक मैदान, उद्यमनगर रत्नागिरी येथे बेशुद्ध स्थितीत काही नागरिकांनी पाहिले. त्याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिस यंत्रणेने सदर तरुणीला सर्वसाधारण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांवरुन ती देवरुख परिसरातील एका गावातील असल्याचे उघड झाले. तिच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. आज सकाळी तिच्या वडीलांनी तिला देवरुख येथे एसटी बसमध्ये बसविले. त्यानंतर ती साळवीस्टॉप रत्नागिरी येथे उतरली. नजीकच ती एका रिक्षामध्ये ती बसली आणि दरम्यान तिला थंड पाणी प्यायला दिले गेले, ते पाणी कडू होते, असे तिने पोलिसांना जबाब देताना म्हटले आहे. रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, सदर तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता दाट असून आम्ही भा.दं.वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या स्थितीत असल्याचे सांगितले.
चंपक मैदान, उद्यमनगर येथे ट्रेनी नर्सवर झालेल्या या अत्याचाराचे पडसाद म्हणून आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत काम बंद आंदोलन छेडले होते. पीडित परिचारिका ही एका खासगी रुग्णालयातील असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात त्वरीत उपचार झाल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याबाबत कठोर पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सेस सध्या कामकाजावर रुजू झाल्या असल्याची माहिती अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद यांनी दिली.