(रत्नागिरी)
समुद्रात रापण लावून मासेमारी करताना तरुणाला समुद्री सापाने दंश केला. संजय रामजी बरड (२८, मूळ रा. उमरगा पालघर, सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी ) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मिरकरवाडा येथील समुद्रात घडली.
संजय बरड हा शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान बोटीवरून शहरातील रत्नागिरी मिरकरवाडा समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. बोटीवरुन रापण लावून तो मासेमारी करत असतानाच एका समुद्री सापाने त्याला दंश केला. त्याने आपल्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना याबाबत सांगताच त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरु केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.