(रत्नागिरी)
बसस्टॅण्ड येथे बसमध्ये चढ़त असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा रत्नागिरीत घडला होता. त्यानंतर पोलीसांनी सुत्रे हलवून बसस्टॅण्डवरील गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या सराईत महिलेला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करून या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. या पथकाकडून आरोपीचा शोध सुरु असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील महिला आरोपी अनघा अनंत जोशी हिने केलेला असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिला आरोपी अनघा अनंत जोशी (वय 63 वर्षे, रा. ए/351, बसेरा, शिवाजीनगर, रत्नागिरी) सध्या रा.जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे हिला 10 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले.
आरोपी अनघा जोशी हिच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीला गेलेला एकूण 45,350 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. अनघा जोशी ही रेकॉर्डवरील सराईत महिला आरोपी असून तिच्यावर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पनवेल या जिल्ह्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरु आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैष्णवी यादव, पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.