(खेड)
केलेला फोन उचलत नाही, म्हणून शेजारणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ फेब्रुवारीला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे घडला आहे.
अरविंद कृष्णा गुहागरकर (रा. चिंचघर प्रभुवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संबंधित जखमी महिलेने ही फिर्याद दिली आहे. ती घरात जेवणाची भांडी घासत असताना त्यांच्या शेजारी राहणारा अरविंद कृष्णा गुहागरकर तेथे आला. त्याच्याशी फोनवर बोलत नाहीस, त्याचा फोन उचलत नाहीस याचा राग मनात धरून त्याने या महिलेचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू आहे, असा समज करून घेतला. त्यातून त्याने आपले केस पकडून जमिनीवर पाडले व ब्लेडने आपल्या गळ्यावर वार केले असल्याचे त्या महिलेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
खेड पोलिसांनी गुहागरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. दाखल झालेला प्रकार नेमका काय आहे, त्यामागे अन्य काही कारणे आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत.