(लांजा)
रानात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय महिलेचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी गोळवशी येथे घडली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गोळवशी तेलीवाडी येथील सुमती दत्ताराम तेली (६५) ही महिला रविवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओमळी या ठिकाणी रानात गुरे चारण्यासाठी गेली होती. मात्र, दुपारी १ वाजले तरी ती गुरे घेऊन घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या घरातील लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती ओमळी या ठिकाणापासून जवळच असलेल्या धावजी मंदिर येथील पुलाजवळ नदीपात्रातील पाण्यात मृतावस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती तिचा मुलगा तानाजी दत्ताराम तेली याने लगेचच लांजा पोलिस स्थानकाला दिली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे मार्गदर्शनाखाली यांच्या पोलिस हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे करीत आहेत.