(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर एसटी स्टॅन्ड येथे एसटी चालक आणि एका रिक्षा चालकामध्ये तुफान हाणामारी झाली. एसटी बस रेस करताना धुरळा उडाला या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले, आणि दोन्ही वरात निघाल्या पोलीस ठाण्यापर्यंत. पोलीस ठाण्यातील कार्यवाही आटोपेपर्यंत प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी काही तास भररस्त्यातच उभी. या भानडगडीत हाल झाले ते प्रवाशांचे. ही घटना बुधवार 12 फेब्रुवारी च्या संध्याकाळी 6.30 वाजता घडली. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली.पोलीस निरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत यादव व हेड कॉन्स्टेबल मनवळ अधिक तपास करत आहेत.
संध्याकाळी साडेसहा वाजता संगमेश्वर -कानरकोंड सुटणारी देवरुख आगाराची एसटी बस एम. एच. 20/बी एल 2585 घेऊन चालक शालिंद्र प्रभू सोनावणे हा संध्याकाळी साडेसहा वाजता संगमेश्वर येथून कानरकोंडकडे घेऊन निघाले असताना संगमेश्वर आगारातून मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर बाहेर येताना महामार्गांवर वाहनांची कोंडी असल्याने एसटी बस चालक शालिंद्र सोनावणे याने ब्रेक लावून बस रेस केल्याने जवळच्या रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असलेल्या रिक्षावर तसेच रिक्षा चालकाच्या अंगावर धुरळा उडाल्याच्या कारणावरून सुरवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर शिव्यांचा तोफमारा अन मग काय तर चालकाला राग आवरता आले नसावे की काय? थेट स्वतःच्या ताब्यात असलेल्या बस चा ताबा सोडून बसमध्ये असलेला चिव्याचा दंडुका घेऊन खाली उतरला, मग काय बसचालक आणि रिक्षा चालक यांच्यात देदणानन सुरुवात, आणि हे पाहण्यासाठी झाली तुफान गर्दी.मग वरात पोलीस ठाण्या पर्यंत.
ऐन नाक्यात सुरु असलेला राडा पाहण्याठी तुफान गर्दी झाली. तर काहींजन बघ्याची भूमिका न घेता राडा सोडवण्यासाठी पुढे सरसावून दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न करूनही बाचाबाची चालूच होती. अखेर पोलीस ठाण्यापर्यंत विषय गेला. रात्री उशिरा येथे बस चालक आणि रिक्षा चालक यांनी परस्परविरोधार तक्रार दाखल केली. यात बसचालक याने रिक्षा चालक नरेंद्र याने गाडी रेस केली धुरळा उडत आहे गाडी रेस करू नकोस असे सांगत शिवीगाळ करत बसच्या खिडकीवर हात ठेऊन सीटवर बसलेला असताना हातावर दांडक्याने प्रहार करत शिवीगाळी केली तसेच मी बस मधून खाली उतरल्यावर पुन्हा दांडक्याने व हाताच्या ठोश्याने मारहाण केल्याची तक्रार केली आहे.
तर रिक्षा चालक याने केलेल्या तक्रारीत बस चालक हा बस रेस करत होता. त्यामुळे धुरळा रिक्षावर अंगावर उडत होता. बस रेस करू नकोस असे म्हटल्याचा राग बस चालकाला आल्याने तो शिवीगाळ करत थेट चिव्याचा दांडा हातात घेऊन बस मधुन खाली उतरून आला व मारहाण करू लागला तसेच रिक्षाचालकाचा मित्र राजाराम गुडेकर यांच्याही कानफटात मारली असे तक्रारीत नमूद केले आहे.
या भानगडीत नाहक भरडला गेला तो प्रवाशीवर्ग. बुधवार संगमेश्वर आठवडा बाजार असल्याने संध्याकाळी या गाडीला बाजारासाठी आलेल्या लोकांची परतीच्या मार्गासाठी शेवटची बस असल्याने गर्दी होती. मात्र या भानगडीमुळे आगाराच्या प्रवेश ठिकाणीच उभी करून चालक वाहक पोलीस ठाण्यात गेले ते तास, दोन तास झाले तरी परत न आल्याने अक्षरशः मेटाकुटीस आले. येथील वाहतूक नियंत्रक यांना दुसरी बस देण्याची विनंती केली ती सुद्धा मान्य न केल्याने रात्रीचे साडे नऊ झाले अखेर रस्त्यावर उभे राहून मिळेल ते वाहन पकडून मार्गस्थ होण्याची वेळ आली. तर वाहतूक कोंडीला सुद्धा उभी करून ठेवण्यात आलेली बस अडथळा ठरत होती.