(संगमेश्वर / प्रतिनिधी)
पुणेस्थित रत्नागिरी येथील कलाकर आदित्य नरेंद्र पराडकर याने सहा महिन्याच्या अथक मेहनतीतून साकारलेले “भारतीय सण आणि उत्सव” हे डिजिटल चित्र सुभाषरोड, रत्नागिरी येथील सुरुची स्वीट मार्ट मध्ये मालक मंगेश गांधी यांनी लावले आहे. उत्सवाची परंपरा सांगणारे हे भव्य चित्र पाहून ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
सुरुची स्वीट मार्टचे मालक मंगेश गांधी यांच्या मनात विविध संकल्पना येत असतात. आपल्या दुकानात येणारा ग्राहक केवळ खरेदी करुन दर्जावरच समाधान न मानता त्यांना काहीतरी आगळावेगळा संदेश देण्याच्या दृष्टीने एखादे भव्य चित्र लावण्याची संकल्पना गांधी यांच्या मनात आली. याबाबत त्यांनी रत्नागिरी येथील पुणेस्थित चित्रकार आदित्य नरेंद्र पराडकर यांच्याजवळ चित्र कसे असावे? याबाबत चर्चा केली.
सुरुची स्वीट मार्टच्या कॅश काऊंटरच्या मागे असणाऱ्या १२ फूट लांब आणि ५ : ६ फूट उंच जागेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे डिजिटल चित्र तयार करण्याचे काम चित्रकार आदित्य नरेंद्र पराडकर याने सुरु केले. या चित्रात गुढीपाडवा, गणेशोत्सव, पंढरिची वारी, रामनवमी, दिवाळी,नवरात्रौत्सव, शिमगा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, नारळीपौर्णिमा, बुद्ध जयंती, बैसाखी, नाताळ आदि १८ सण उत्सावांचे दर्शन होते. हे चित्र ऐन गणेशोत्सवात सुरुची स्वीट मार्ट मध्ये लावण्यात आले आहे.
ग्राहकांचे अनोखे स्वागत
आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि पदार्थ देवून आम्ही त्यांचे स्वागत करतोच, तरीही ग्राहकांसाठी चित्राच्या माध्यमातून अनोखा संदेश देत त्यांचे स्वागत करावे, या हेतूने ” भारतीय सण उत्सव ” हे भव्य चित्र दुकानात लावण्याची संकल्पना आपल्या मनात आली.
मंगेश गांधी सुरुची स्वीट मार्ट, सुभाष रोड रत्नागिरी
चित्रात जीव ओतण्याचा प्रयत्न
भारतीय सण आणि उत्सव या संकल्पनेवर चित्र साकारण्याचे ठरल्यानंतर प्रथम पाहिले पंधरा दिवस रेखाटन करण्यातच गेला. अंतिम रेखाटनाला गांधी यांनी मान्यता देताच प्रत्यक्ष चित्र रेखाटन आणि रंगकामाला सुरुवात केली. आपली अन्य कामे सांभाळून सहा महिन्याच्या कालावधीत अक्षरशः आपला जीव ओतून हे चित्र साकारण्याचा आपण प्रयत्न केला. मंगेश गांधी यांनी संधी दिल्यानेच आपण एवढे भव्य डिजिटल चित्र साकारू शकलो.
आदित्य नरेंद्र पराडकर चित्रकार, रत्नागिरी