(संगमेश्वर)
महावितरण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो पोलावर चढून विद्युत वाहिनींची जोडणी करणारा कर्मचारी वा बिलांच्या वसुलीसाठी फिरणारा कर्मचारी. मात्र हाच कर्मचारी आपल्या वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा एखादा समाजोपयोगी असा स्तुत्य उपक्रम राबवतो. त्यावेळी त्याच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलतो आणि मग त्या उपक्रमाचे कौतुक करावेसे वाटते. संगमेश्वर तालुक्यातील महावितरणच्या शाखा कार्यालय कोसुंब व उपकेंद्र साडवलीच्या कर्मचाऱ्यांनी शिवजयंतीनिमित्त वांझोळे येथील कै. दत्ताराम पंदेरे वाचनालयाला शिवाजी महाराजांसह संत मंडळींची कार्य सांगणारी पुस्तके भेट स्वरूपात दिली आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
संगमेश्वर तालुक्यात सोमवारी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे महावितरणच्या शाखा कार्यालय कोसुंब व साडवलीच्या कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता आकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी आगळ्यावेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन केले होते. शिवाजी महाराजांसह थोर संतांची शिकवण आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शिवजयंतीच्या निमित्ताने एखादा उपक्रम राबवला तरच शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिल्यासारखे ठरु शकेल.
हाच उद्देश ठेवून यावर्षी शिवजयंतीनिमित्त महावितरणच्या कोसुंब व साडवली येथील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत तालुक्यातील वांझोळे येथील कै. दत्ताराम पंदेरे वाचनालयाला शिवाजी महाराजांसह संत मंडळींचे कार्य सांगणारी पुस्तके भेट दिली आहेत. कै. दत्ताराम पंदेरे वाचनालया विषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास बांझोळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय नेहमी खुले असते. या वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील एकुण ११ वाड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक रविवारी वाचन कट्टे चालतात. त्यामुळे महावितरणकडून या वाचनालयाला.भेट स्वरुपात देण्यात आलेल्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे व थोर संतांचे कार्य, शिकवण तरुण पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.
महावितरणच्या कोसुंब येथील कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महावितरणचे कनिष्ठ अभियंता आकाश जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची महती आपल्या मनोगतातून सांगितली. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वांझोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक लिंगायत शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा देताना महाराजांचा दृष्टीकोन, नियोजन आणि ध्येय या महत्त्वाच्या गोष्टींवर मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर दीपक लिंगायत यांचेकडे वाचनालयासाठीची पुस्तके सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर महावितरण कार्यालय परिसराची कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावितरणचे यंत्रचालक संजय भोसले, राम भाटकर, रविंद्र घाणेकर, विवेक पुरोहित, प्रधान तंत्रज्ञ रमेश शिंदे, वरिष्ठ तंत्रज्ञ बाबू बावधने, मिनाक्षी जाधव, योगेश लिंगायत, विद्युत सहाय्यक उदय आलीम, बाह्यस्त्रोत कर्मचारी तेजस खाके, दीपक घोगले, राजेंद्र तेरवकर, सुरज साळवी, विशाल फेपडे, शैलेश लाने यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन योगेश लिंगायत यांनी केले तर राम भाटकर यांनी सर्वांचे आभार मानले.