(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका दिवसेंदिवस सुरू आहे. हातखंबा पाली भागातील अपूर्ण कामामुळे नाहक अपघातांना वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी दि.13/12/2024 रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील डेंजर झोन बनलेल्या हातखंबा दर्गाजवळ दुचाकीला मागून टँकरने धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला आहे.
या अपघातातील धडक देणारा टँकर ( गाडी क्रमांक MH -05-FJ -3057 ) हा हातखंबा परिसरात महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार इंगल कंपनीचा असल्याचे समोर आले आहे. शिशिर शांताराम रावनंग (वय-35 वर्ष,रा. निवळी रावनंगवाडी, रत्नागिरी ) हा चरवेलीहून हातखंब्याच्या दिशेने दुचाकीवरून (दुचाकी क्र. MH -08-BA -3677) प्रवास करत होता. शिशिरने हातखंबा दर्गाजवळ उतार असल्याने तसेच काही फुटावर गतिरोधक असल्याने गाडीचा वेग कमी केला. मात्र पाठीमागून येणाऱ्या ठेकेदार इगल कंपनीचा पाण्याचा टँकर चालक खुशबू अली ( पूर्ण नाव गाव समजून येत नाही, सध्या राहणार -मुंबई गोवा महामार्गचे काम करणाऱ्या इगल कंपनीचे कार्यालय रत्नागिरी,) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. खुशबूने पुढे असलेल्या शिशिरच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शिशिर हा जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघाताची माहिती जगातगुरू श्री नरेंद्र महाराज संस्थांनाचे रुग्णवाहिकेचे चालक बाळू केतकर यांना मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदतीसाठी धावून आलेल्या वाहनचालकांनी जखमी शिशिर रावनंग याला रुग्णाहिकेतून उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र तरुण तडफदार शिशिर रावणंग याची रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्राणज्योत मालवली.
दरम्यान अपघातग्रस्त वाहने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधीकारी व अंमलदार यांनी रीतसर पंचनामा करून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला केली. तसेच रस्त्यामध्ये पडलेली खडी इगल कंपनीला साफ करायला लावून महामार्गवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी म. पो. केंद्राचे पो. अंमलदार, एएसआय हलगी, एएसआय पावसकर, हेड कॉन्स्टेबल भरणकर उपस्थित होते. अपघाताची पुढील कार्यवाही रत्नागिरी ग्रामीण पो. ठाण्याचे पो. अधीकारी व अंमलदार करीत आहेत.
ठेकेदार कंपनीमार्फत ट्रक चालकांना सूचना देणे आवश्यक
गेल्या अनेक महिन्यांपासून हातखंबा भागात मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम ठेकेदार ईगल कंपनीमार्फत करण्यात येत आहे. हातखंबा ते पाली या पट्ट्यात तुकड्यात लेन पूर्ण करून वाहतूक सुरू करण्यात आली असली तरीही काही ठिकाणी मातीचा रस्ता तसाच खराब स्थितीत आहे. त्यावर मोठं- मोठे खड्डे निर्माण झाले आहे. या खड्ड्यामधून दुचाकींवरून रात्रीचा प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. मात्र ठेकेदार ईगल कंपनीचे ट्रक ड्रायव्हर या खडद्यामधून छोट्या गाड्यांची पर्वा न करता सुसाट वेगाने असतात. या सर्व ट्रक चालकांना ईगल कंपनीच्या व्यवस्थापकांनी योग्य ती समज किंवा सूचना देणे आवश्यक आहे. तसेच शिषिरच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या ट्रकचालकावर गुन्हा दाखल करावा.