(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील निधळेवाडी येथे रिक्षाला कारने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा रस्ता सोडून दरडीवर कालांडून झालेल्या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील कलंबस्ते येथील मूळ गाव असलेले व सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले असलम सुलेमान बोट (वय वर्ष 54) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघाताच्या वेळी त्यांच्या पत्नी शबाना असलम बोट याही रिक्षामध्ये होत्या, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. हा अपघात शनिवारी संध्याकाळी झाला.
गावी आलेल्या अस्लम बोट यांचेवर काळाचा घाला
संगमेश्वर कलंबस्ते शनिवारी दर्गा चा उर्स असल्याने रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले अस्लम बोट व त्यांची पत्नी शबाना बोट रिक्षाने कलंबस्ते येथे शनिवारी आले होते व संध्याकाळी पुन्हा त्यांच्या ताब्यात असलेली रिक्षा क्रमांक MH 08E 7089 घेऊन स्वतः रत्नागिरी येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या MH08 AG 2687 क्रमांक्रच्या रेनौल्ट या चारचाकी कार ने जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्ता सोडून थेट दरडीवर कलंडली व येथेच अस्लम बोट यांच्यावर काळाने घाला घातला. तर त्यांच्या पत्नी शबाना यांच्या डोक्याला जबर मार लागला.
अपघात कार चालक पसार
पाठीमागून रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचे तर नुकसान झालेच, परंतु कार च्या पुढील बाजूचे झालेले नुकसान पाहता कारचा वेग आणि रिक्षाला दिलेली धडक याचा अंदाजच काढता येणार नाही. तर अपघात घडताच कारचालक हा तेथून पसार झाला.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी
अपघात झाल्यानंतर रिक्षातील अस्लम बोट व त्यांच्या पत्नी यांना अंब्युलेन्सने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापूर्वीच अस्लम बोट यांचे निधन झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी काही वेळेतच सर्वत्र पसरली आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात व बाहेर अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी रुग्णालय परिसरात अक्षरशः अनेकांनी हंबरडा फोडला. यावेळी त्यांचे गावावरही शोककळा पसरली होती.
तणावपूर्ण वातावरण
बेदरकार वाहन चालवून अपघातास जबाबदार असलेला चालक अपघात स्थळावरून पसार झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या लोकांनी कार चालकाला ताब्यात घेण्याच्या मागणीला जोर धरला. त्यामुळे काहीवेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी उपस्थिती सर्वांना शांत होण्याचे आवाहन व विनंती केली. त्यांच्या विनंतीला उपस्थितांनी मान देत शांतता राखली. या अपघाताबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.