(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनींशी गैरकृत्य केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीने पालकांना याबाबत सांगताच पालकांनी शाळेत येवून अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला धडा शिकवला. यासोबत पालकांना मारहाण करणाऱ्या शाळेच्या शिपायाला देखील महिलांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. संबंधित घटना समजतातच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले, त्यांनी तातडीने शिक्षकाचे निलंबन केले असल्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वी रत्नागिरी शहरात अशोभनीय प्रकार घडले नाही. मात्र सध्या शाळेतील अश्लील प्रकरणांसंदर्भात घटना समोर येत आहे. अशाच एका नामवंत शाळेत दहावीतील विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने मार्क पाहिजे असतील, तर मला खूश ठेवावे लागेल, असे सांगत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाला शहर पोलिसांनी अटक केली. प्रथमेश चंद्रकांत नवेले (रा. नाचणे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षकाविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही धक्कादायक घटना 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली. या बाबत पीडित विद्यार्थीनीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडिता ही 10 वीमध्ये शिकत असून 9 जानेवारी रोजी दुपारी 1 वा. सुमारास शाळेत शेती व पशुपालन या विषयाचे प्रॅक्टिकल सुरु होते. त्यावेळी पीडितेसह तिच्या मैत्रीणी अशा एकूण तिघीच बॅचला होत्या. प्रॅक्टिकल शिकवण्यासाठी त्या शिक्षकाने गुलाबाच्या फांद्या आणल्या होत्या. त्यांचे कलम कसे तयार करायचे, हे शिकवत असताना गुलाबाची रोपे पिशवित लावण्यास सांगितले. तेव्हा पीडितेच्या दोन्ही मैत्रिणी माती आणण्यासाठी प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर मैदानात गेल्या होत्या. तेव्हा शिक्षक प्रथमेश नवेलेने पीडिता एकटीच असल्याची संधी साधत तिच्या जवळ जात थांब तुला फांदी कापायला शिकवतो, असे म्हणाला. त्यावर पीडितेने त्याला नको, असे सांगितले. तरीही त्याने पीडितेचा हात धरुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच मार्क पाहिजे असतील तर मला खूश ठेवावे लागेल, असे म्हणाला. तेव्हा पिडीता घाबरुन प्रॅक्टिकल रुमच्या बाहेर निघून गेली होती. त्यानंतर घाबरल्यामुळे तिने दोन दिवस याबाबत कोणालाही सांगितले नव्हते.
अखेर तिला या धक्कादायक प्रसंगामुळे अस्वस्थ वाटू लागल्यावर तिने 11 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. तेव्हा त्यांनीही नवेले सर आपल्या सोबतही असेच अश्लिल प्रकार करत असल्याचे त्यांनी पीडितेला सांगितले. पीडीतेच्या मैत्रिणीने ही सर्व हकिकत पीडीतेच्या आईला फोनव्दारे कळवल्यानंतर सोमवार 13 जानेवारी रोजी या सर्व विद्यार्थीनींचे पालक शाळेत धकडले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
पालकांनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर प्रथमेश नवेलेने या सर्व विद्यार्थीनी खोटे बोलत असल्याचा कांगावा करत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या नंतर पालकांनी संतप्त होत या शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या शिक्षकाला पालकांच्या ताब्यातून सोडवत चौकशीसाठी ताब्यात घेतले. या अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
शिक्षकाला संस्थेने तत्काळ काढून टाकले
घटनेनंतर संस्थेचे पदाधिकारी, नियामक मंडळाचे सदस्य शाळेत हजर झाले. शाळेत आजपर्यत अशोभनिय कृत्य घडलेले नाही, त्यामुळे संबंधित गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला पाठिशी न घालता तातडीने निलंबन करत असल्याचे जाहीर केले. हा शिक्षक गेली पाच वर्षे या शाळेत कार्यरत होता. संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेत या शिक्षकाला तातडीने शाळेतून काढून टाकले आहे. अशा प्रवृत्तीला संस्था थारा देणार नसल्याचेही विश्वस्तांनी सांगितले. संबंधित घटनेबाबत चाैकशी करण्यात येणार आहे. शिपायाचीही चाैकशी करणार असून आरोपात तथ्य आढळले तर योग्य कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.