(रत्नागिरी)
सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनाला बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक घरी घेवून जाणे, पावती पुस्तकावर मुख्याधिकार्यांची परवानगी न घेताच नाव छापणे आदी कारणांचा ठपका ठेवत रत्नागिरी तालुक्यातील कशेळी शाळेतील शिक्षक प्रविण किणे याला निलंबीत करण्याची कारवाई जि.प. प्रशासनाने केली आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली.
कशेळी शाळेतील या पदवीधर शिक्षकाच्या विरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा शिक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळला आहे. यामुळे त्याच्यावर गुरूवारी जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
शासकीय सेवेत असताना सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे तसेच शासनाची बदनामी करणे, निर्भय बनो या व्हाटस्अप समुहावर शासनाच्या विरोधी पोष्ट ही स्वत:च्या मोबाईलवरून केली असल्याचे चौकशी समितीकडील अहवालावरून सिद्ध होत आहे. शाळेतील शिक्षकांचे आपापसातील मतभेदामुळे शैक्षणिक दर्जा खालावत असून पटसंख्येत अचानक घट दिसून आली. व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचना न पाळणे, ग्रामस्थांना, पालकांना अथवा शाळेतील कोणालाही विश्वासात न घेता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लकी ड्रॉ कुपन पावती पुस्तक छपाई करून वर्गणी जमा करणे तसेच शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदूळ परस्पर घेवून जाणे, शाळेतील संगणक घेवून जाणे आदी कारणांचा ठपका ठेवत या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
या शिक्षकाने कर्तव्यात गंभीर स्वरुपाची कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जि.प. (वर्तणूक) नियम 1967 मधील तरतूदीचा भंग केलेला आहे. यापूर्वीही या शिक्षकाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले होते. तरीही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसून येत नाही. यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील भाग 2 नियम 3 (1) (अ) मधील तरतूदीनुसार प्रविण किणे याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची स्वाक्षरी आहे.
यापूर्वीही हा शिक्षक वादातच…
हा शिक्षक नेहमी या ना त्या कारणाने वादात असतो. यापूर्वीसुद्धा दोन वेळा या शिक्षकाविरोधात जि.प.ने कारवाई करत निलंबीत केले होते. आता पुन्हा निलंबीत करण्यात आले आहे.
या शिक्षकाचे वर्तन शिक्षकी पेशाला अशोभनिय असून त्याने आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरुपाची कसूर केल्याने कारवाई करण्यात आली आहे. सध्या निलंबीत करून त्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
– किर्तीकिरण पुजार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी.