(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटातील भोगाव गावाच्या हद्दीत खचलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला. ही घटना गुरुवार रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने चालक बचावला आहे.
अंकित राजेश कुमार यादव (३०, रा. प्रतापगड, राणीगंज उत्तर प्रदेश) टँकर (जीजे १३ बी डब्ल्यू ३५४४) घेऊन लोटे ते दौंड पुणे असा जात होता. कशेडी घाटात भोगाव गाव रस्त्याचा अंदाज न आल्याने तो उलटला आणि लगतच्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकला. प्रसंगावधान राखल्याने किरकोळ दुखापत वगळता चालक बचावला आहे. दरम्यान येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर टँकरमध्ये वाहनांचे सीट कव्हर बनविणारे फोम (केमिकल) असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
बोगद्यातून छोट्या गाड्या जात असल्या तरी मोठ्या गाड्या अजून घाटातूनच जात आहेत. कशेडीतील वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक थांबणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली.