(रत्नागिरी)
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हातखंबा पशुवैद्यकीय दवाखान्याला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील गलिच्छपणा, अस्वच्छता पाहून ताशेरे ओढले. रुग्णालयातील कर्मचारी स्वच्छतेला महत्त्व देत नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये १७ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या काळात स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. विविध शासकीय कार्यालये, त्याचा परिसर, अधिकाऱ्यांची निवासस्थाने स्वच्छ करण्यात आली. स्वच्छता सप्ताहांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हातखंबा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला बुधवारी (दि. ६) अचानक भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयाची स्थिती अत्यंत वाईट असून, या ठिकाणी नोंदवह्या अद्ययावत ठेवण्यात आलेल्या नाहीत, टापटीपपणा नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांच्या निदर्शनाला आले.
तसेच या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी रामचंद्र नरुटे यांनी तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यामध्ये कोणताच बदल झालेला नसल्याने अधिकाऱ्यांचा अवमान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या दवाखान्यातून उद्दिष्टापेक्षा कमी काम करण्यात आले आहे, याचा तत्काळ खुलासा करावा, अशाही सूचना पशुधन पर्यवेक्षक विराप्पा कुरणे यांना करण्यात आली आहे.
सूचनांचे पालन न झाल्यास
पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिपूर्ण कामे करून ११ नोव्हेंबर रोजी उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या केंद्राला पुन्हा अधिकारी भेट देणार आहेत. त्यामुळे दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.