(रायगड)
अलिबाग समुद्र किनाऱ्यावर कुलाबा किल्ल्यापासून काही अंतरावर एक मालवाहू जहाज भरकटत अडकले असून समुद्राच्या लाटांमुळे हेलकावे खात उभे आहे. धरमतर बंदरातून 25 जुलै रोजी हे मालवाहू जहाज जयगडकडे रवाना झाले. मात्र, काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात अडकले. दरम्यान, हे जहाज जेएसडब्लू कंपनीचे असून कंपनीकडून जहाजावरील 14 खलाशांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी अन्य जहाजातून तंत्रज्ञ पाठवून बंद पडलेल्या जहाजातील तांत्रिक बिघाड दूर केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, जहाज भरकटले असल्याचे लक्षात आल्याने जहाजाच्या कॅप्टनने कुलाबा किल्ला परिसरात नांगर टाकून जहाज उभे केले आहे.
सदर जहाज जेएसडब्ल्यू कंपनीचे असून ते धरमतर बंदरातून जयगड बंदराकडे कच्चा माल म्हणजेच कोळसा घेऊन निघाले असल्याचे समजते. परंतु, खराब हवामान किंवा काही तांत्रिक कारणाने अथवा भरकटल्यामुळे ते जहाज भरसमुद्रात थांबले असावे, अशी माहिती आहे.
या भरकटलेल्या मालवाहू जहाजावरील खलाशी सुखरूप असून त्यांना किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत जहाजावरील सर्व खलाशांना किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु होते. समुद्राच्या लाटा, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे बदललेल्या वातावरणात हे मालवाहू जहाज भरकटले असावे. दरम्यान, जहाज भरकटले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जेएसडब्ल्यूच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.