(संगमेश्वर)
तालुक्यातील किरडुवे येथील एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी तुळसणी येथील २४ वर्षीय तरुणावर सोमवारी देवरुख पोलिस स्थानकात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, रासिक कासम बोट असे या संशयित तरुणाचे नाव आहे. रासिक गेली दीड वर्ष किरडुवे गावातील एका अल्पवयीन मुलीला दूरध्वनी करून, पाठलाग करणे तसेच प्रत्यक्ष भेटून त्रास देत होता. वारंवार छेडछाड करत होता. याप्रकरणी रासीक बोट याला मूलीच्या नातेवाइकांकडून समजही देण्यात आली होती. मात्र, रासिक याच्या वागण्यात कोणतीच सुधारणा झाली नाही. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून त्या मुलीने सोमवारी देवरुख पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्या मुलीचे नातेवाईक आक्रमक झाले होते.
या फिर्यादीनुसार रासिक बोट याला देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक यशवंत केडगे यांनी देवरुख पोलिस स्थानकात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास उपअधीक्षक यशवंत केडगे व पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर करत आहे.