(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील सौरव रसाळ यांना सलग दुसऱ्या दिवशीही बिबट्याचे दर्शन झाले. आज (रविवार) पहाटे 5.11 वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ येऊन बाजूच्या बंद घराच्या ठिकाणी असलेल्या कुत्र्याची त्याने शिकार केली, हे दृश्य सौरव यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पुन्हा एकदा कैद झाले आहे.
काही दिवस संगमेश्वर बाजारपेठ तसेच मानवी वस्तीच्या ठिकाणी बिबट्याचे वावर सुरु असल्याची चर्चा तसेच भटक्या व पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे बिबटयाच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना शनिवारी रात्री 10 च्या सुमारास येथील पोस्ट गल्ली रस्त्यामार्गे चारचाकी कार घेऊन घरी येणाऱ्या सौरव रसाळ यांच्या गाडीसमोर येऊन बिबट्याने दर्शन दिले, हे दृश्य त्यांच्या कारच्या कॅमेऱ्यात कैदही झाले. त्यामुळे या भागात बिबट्याचे वावर आहे हे स्पष्ट झाले. तसेच कॅमेऱ्यात कैद झालेले बिबट्याचे दृश्य सर्वांच्या मोबाईल पर्यंत पोहचल्याने लोकांच्या मनातील बिबट्याची दहशत अधिक गडद झाली. तर बिबट्याचा शहरात व मानवी वस्तीत वावर असल्याच्या सोशल मीडिया तसेच वृत्त पत्रात प्रसारित झालेल्या वृत्ताला दुजोराही मिळाला.
आज पहाटे याच पोस्ट गल्लीत असलेल्या सौरव रसाळ यांच्याच घरासमोरील पडवीत पहाटे 5.11 वाजण्याच्या सुमारास येऊन आजूबाजूला बिनधास्त पणे टेहळणी करून पडवीच्या कठड्यावर रुबाबात उभे राहून बाजूच्या बंद असलेल्या एका घराच्या अडगळीत लावण्यात आलेल्या पत्र्यावरून उडी घेत त्या ठिकाणी असलेल्या कुत्र्यांच्या पिल्लावर झडप घालून दोन पिल्लांना घेऊन तेथून पळ काढला. हे सर्व दृश्य सौरव रसाळ यांच्या घराला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मात्र आदल्या दिवशी आलेल्या बातमीची दखल घेत वनविभागाकडून सौरव च्या चारचाकी समोरून ज्या ठिकाणी बिबट्या ने पळ काढला त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आला असून याच दिशेहून जर बिबटया आला असेल तर साहजिकच त्या कॅमेऱ्यातही कैद झालेला दिसून येईल. जर का वेगवेगळ्या मार्गाने त्याचे येणे -जाणे व वावर असेल तर एकाच ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कसे दिसून येणार हा प्रश्नच आहे. यासाठी वनविभागाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन अधिक कॅमेरे लावण्याची तसदी घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.