(खेड)
तालुक्यात बहिरवली गावातील मोहल्यात गुरुवार दि. २८ रोजी पहाटे १.३० ते २.३० या कालावधीत एका घराला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अब्दुल्ला युसुफ चौगुले व बाशिरा चौगुले यांचे बहिरवली गावातील मोहल्यात घर आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराला अचानक आग लागली.
यावेळी मोठा आवाज झाल्याने सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ वर्तवत आहेत. यावेळी प्रसंगावधान राखत परिसरातील लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीचा भडका उडाल्याने घरातील सर्व वस्तू आगीत जळून गेल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी खेड नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावले. अग्निशामक दलातील जवानांनी अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.