(सावंतवाडी)
सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर निवासी संकुलाचे काम सुरू असून या कामासाठी स्वार हॉस्पीटलच्या बाजूच्या संरक्षक भिंतीची माती काढत असताना अचानक तिघांवर मातीचा ढिगारा कोसळला. यात ढिगाऱ्याखाली अडकून एक महिला जागीच ठार झाली. तर दोघांना वाचविण्यात यश आले.
शारूबाई गोविंद राठोड (वय ३२ मूळ रा. विजापूर कर्नाटक सध्या. सावंतवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. गोविंद राठोड (३६), चांदुबाई दीपक जाधव (३३) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची ही प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदाना समोर एका निवासी संकुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी स्वार हॉस्पीटलच्या बाजूच्या भितीची असलेली माती काढण्यात येत होती. त्याच वेळी तिथे काही कामगार काम करत होते. दरम्यान, बाजूच्या भितीचा ढिगारा कोसळून शारूबाई राठोड, गोविंद राठोड, चांदुबाई जाधव या ढिगाऱ्याखाली अडकल्या.
या घटनेनंतर कामगारांनी धावाधाव करून नागरिकांना बोलवले तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने ढिगारा बाजूला करण्यात आला. यात शारूबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
पती समोर पत्नीचा मृत्यू
मातीचा ढिगारा खाली आला तेव्हा तिघे तेथे काम करीत होते. यात मृत शारूबाई सोबत पती गोविंद हा देखील होता. पण त्याने पत्नीला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. अन् पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. तोही यात जखमी झाला असून त्याला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.