(रत्नागिरी)
एकच मिशन जुनी पेन्शन, रद्द करा, रद्द करा शिक्षण सेवक पद रद्द करा. या घोषणांनी रत्नागिरी शहर रविवारी दुमदुमले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन संघटना समन्वय समिती यांच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच शिक्षण सेवक पद रद्द करणे यांसह विविध मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाची सुरुवात माळ नाका रत्नागिरी येथून झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे. यात देखील बदल करण्यात येऊन आता जीपीस या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे म्हातारपणीचे आयुष्य अंधकारमय बनले आहे. त्यामुळे 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह शिक्षण सेवक योजना रद्द करावी, DCPS खात्यात जमा असणाऱ्या रक्कमांवर आजपर्यंतचे व्याज मिळावे, सुधारित संच मान्यता निकष रद्द करावेत, शिक्षक भरती च्या जाचक अटी रद्द कराव्यात, बी एल ओ कामे शिक्षकांकडून काढून अन्य यंत्रणेमार्फत करून घ्यावेत, एम एस सी आय टी ची मुदत वाढवून मिळावी, नवभारत साक्षरता अभियानसह अशैक्षणिक व ऑनलाईन कामे इतर यंत्रणे मार्फत करून घ्यावीत. अशा मागण्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासकीय – निम शासकीय कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, त्याचबरोबर शिक्षकेत्तर संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या होता. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी मोठ्या एकजुठीने क्रांतीकारी आक्रोश मोर्चा काढला. क्रांती दिनी ९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर दि. ११ रोजी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये काही कर्मचारी व्रत म्हणून पेन्शन मिळेपर्यंत अणवाणी प्रवास करीत आले त्या मध्ये नाणार येथील एका शिक्षकाचा समावेश आहे तर काही कर्मचारी आपल्या मुला बाळांसह आजच्या आक्रोश करताना दिसले. खऱ्या अर्थाने कुटुंबासह कर्मचारी आक्रोश करीत असताना शासनाचे डोळे उघडावेत म्हणून अनेकांनी घोषणाबाजी करीत, क्रांतीकारी गाणी गायली .
महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह खालील मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन समन्वय समिती जिल्हा रत्नागिरीच्या वतीने रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी दु. 12 ते 4 या वेळेत भव्य महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आला. हजारोंच्या संख्येने सुमारे दोन किमी लांबी च्या या आक्रोश मोर्चामुळे अनेक ठीकाणी वाहतूक खोळंबताना दिसली मात्र त्यास मोर्चेकरयांनी उत्तम सहकार्य केले. दरम्यान सदरच्या महाआक्रोश मोर्चामध्ये अनेक मागण्यांचा समावेश आहे . यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी.
शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन आक्रोश मोर्चातर्फे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण व जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे. माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान शिष्ट मंडळाने निवासीअपर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन दिले व मोर्चाची सांगता करण्यात आली.