(दापोली)
तालुक्यातील मित्रांमधील क्षुल्लक कारणाचा वाद खून करण्यापर्यंत गेला. कोळथरे येथील विशाल मयेकर खून प्रकरणातील संशयित शशिभूषण शांताराम सनकुळकर (४७, रा. कोळथरे, दापोली) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गेले तीन दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गावातील एका शेतात लपून बसलेल्या शशिभूषणला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.
दारू पिताना मित्रा-मित्रांमध्ये वाद होऊन विशाल शशिकांत मयेकर (३९, रा. पंचनदी-निमुर्डेवाडी) याचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. गावात चौकशी केली असता, मयत विशाल मयेकर, संशयित शशिभूषण सनकुलकर व मनोज आरेकर यांची चांगली मैत्री असल्याचे समजले. हे तिघेही मजुरीचे काम करत होते.
शनिवारी रात्री तिघेही मनोज आरेकर याच्या कोळथरे खालचा भंडारवाडा येथे एकत्र दारू प्यायला बसले होते. तिथे त्यांचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद विकोपला गेला. यावेळी शशिभूषण याने स्वतःजवळील कोयता विशाल मयेकर याच्या डोक्यात मारला. वार केल्यानंतर शशिभूषण हा लागलीच तेथून पसार झाला होता. मात्र, यामध्ये विशाल मयेकर याचा मृत्यू झाला.
संशयित सनकुळकर याचा माग काढण्याकरिता पोलिसांच्या श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या श्वानाला तेथे पडलेल्या चपलेचा वास दिल्यानंतर तो प्रथम घटनास्थळीच घुटमळला. त्यानंतर, त्याने गावातील दर्यापर्यंतचा माग काढला. मात्र, त्याच्यापुढे श्वान तपास करू शकला नाही. दरम्यान, तो तेथीलच जवळच्या शेतात लपल्याचा संशय पोलिसांना आला. तिथे तपास केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.