(रत्नागिरी)
मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा गद्रे पेट्रोल पंपाच्या खाली उतारात दुचाकी असताना ओव्हरटेक करणाऱ्या डंपरचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी 7.30 वा. घडली.
कल्पिता किशोर घडशी (52, रा. नाणीज घडशीवाडी, रत्नागिरी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ती दत्ताराम नारायण दरडी (रा. रेल्वेस्टेशन, रत्नागिरी) याच्या दुचाकीवर पाठीमागे बसून रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते नाणीज प्रवास करत होती. दुचाकी हातखंबा येथील गद्रे पेट्रोल पंपाच्या खालील बाजूस आली असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करताना डंपरचा धक्का लागून हा अपघात झाला. यात कल्पिता घडशी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरु होती.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1