(संगमेश्वर / एजाज पटेल)
धामणी येथील 34 वर्षीय नापत्ता युवकाचा बडदवाडी येथे नदी पात्रजवळ झाडीझूडपात बुधवारी संध्याकाळी मृतदेह सापडून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धामणी येथील प्रशांत बुद्धम पवार (वय वर्षे 34) हा युवक दि. २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता घरातून निघून गेला होता. यावेळी त्याने आपण अहमदाबाद येथे जातो म्हणुन सांगितले होते.
बरेच दिवस झाले तो घरी न आल्याने व कोणताही संपर्क त्या काळात न झाल्याने संगमेश्वर पोलीस ठाणे येथे नापत्ता असल्याची नोंद दाखल करण्यात आली होती. या नापत्ता झालेल्या युवकाचा बुधवारी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या धामणी बडदवाडी नदी पात्राजवळ झाडीझूडपात कुजलेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस दाखल होत पुढील कार्यवाई करून मृतदेह शवविच्छेदणासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून पुढील कार्यवाई पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
अहमदाबाद येथे जातो म्हणुन घरातून निघून गेलेल्या प्रशांत याचा नदीपात्राजवळ झाडीझूडपात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा घातपात की आत्महत्त्या अशी चर्चेला सुरु आहे.