(रत्नागिरी)
शहरातील निवखोल येथे महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना विजेचा जोराचा धक्का लागून तरुण कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सोमवार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली.
कुंदन दिनेश शिंदे (21, रा. फणसवळे भावेवाडी, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. सोमवारी दुपारी तो निवखोल येथील महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत होता. पोलवर चढण्यापूर्वी तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. परंतू पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना तेथील जनरेटरचा करंट बॅक आल्याने त्याचा जोरदार धक्का कुंदनला बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब त्याच्या इतर सहकार्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी कुंदनला तपासून मृत घोषित केले.
आज सोमवार असल्याने पूर्ण लाईन बंदच होती; मात्र वायर जोडताना त्याला धक्का लागून तो चिकटून राहिल्याने बेशुद्ध पडला. दरम्यान, विद्युत पुरवठा बंद असताना धक्का कसा लागला, याचे कारण समजू शकले नाही. धक्क्याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र निवखोल परिसरात सोमवारी वीज नसल्यामुळे कुणाकडे जनरेटर लावला असला तर रिव्हर्स करंटचा शॉक लागू शकतो, अशी चर्चा कामगारांमध्ये होती. कुंदनला खाली उतरून तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर पोलिस फौजफाटाही दाखल झाला होता.