(दापोली)
तालुक्यातील विसापूर येथे क्षुल्लक कारणावरून संतोष केरबा हेगडे या 36 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हेगडे हा 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता त्याचा मित्र दिनेश सुर्वे याच्याबरोबर बोलत होता. त्यावेळेला मुकेश मधुकर साळवी व मयूर मधुकर साळवी यांनी त्याला ‘तू येथे थांबायचे नाही’ असे सांगितले. त्याचा जाब विचारला असता मुकेश साळवीने हाताने व लाकडी दांडक्याने तसेच मयूर साळवीने बॅटने व लाथा बुक्क्याने संतोषला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये संतोषच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच सूरज संभाजी मोरे व संभाजी मोरे हे संतोषच्या आई- वडीलांच्या अंगावर मारण्यासाठी धावत गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.