(रत्नागिरी)
तालुक्यातील सापुचेतळे येथे किरकोळ कारणातून एकमेकांना मारहाण केल्याची घटना सोमवारी न दुपारी घडली. याप्रकरणी पूर्णगड पोलिस स्थानकात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी शंकर माने (३२), दीपक शिवाजी माने (२८) व एक महिला (सर्व रा. नाचणे पांडवनगर, रत्नागिरी) आणि आकाश रतन चव्हाण (२८), विकास रतन चव्हाण, एक महिला (सर्व रा. मिरजोळे-एमआयडीसी, रत्नागिरी) अशी ६ जणांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश रतन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते टेम्पोतून उसाचा रस गावोगावी भरणाऱ्या बाजारात जाऊन विक्री करण्याचा व्यवसाय करतात.
सोमवारी ते सापुचेतळे येथे उसाचा रस विक्री करत असताना त्यांच्या टेम्पोच्या बाजूला भाजी विक्रीसाठी ठेवलेल्या क्रेटची त्यांना अडचण होऊ लागली. त्यामुळे त्यांनी तो बाजूला सरकवला. याचा राग आल्याने शिवाजी शंकर माने, दीपक माने आणि एका महिलेने तेथील भाजी कापण्याच्या सुरीने आकाश चव्हाण यांच्या कपाळावर मारून दुखापत केली.
याप्रकरणी शिवाजी माने यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते भाजी विकत असताना त्यांनी आपला क्रेट तेथे ठेवला या रागातून आकाश चव्हाण, विकास चव्हाण आणि एका महिलेने ‘तुमचा भाजीचा क्रेट बाजूला कर,’ असे सांगून उसाच्या बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.