(रत्नागिरी)
शहरातील जयस्तंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयालगत मारुती मंदिर देवळाजवळ झालेल्या हाणामारीप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आठजणांविरुद्ध परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कोळी, त्यांचे वडील, आई, भाऊ (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.) असे संशयित आहेत. हाणामारीची घटना बुधवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी राजाराम गोपीनाथ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांच्या मालकीचा दुकान खोका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आहे. त्या ठिकाणच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने खोका बाजूला करून ठेवला आहे. त्या ठिकाणी संशयित सुनील कोळी हा कलिंगड विक्री करत होता, म्हणून फिर्यादी यांनी मला पानटपरीचा व्यवसाय करायचा आहे, असे सांगितले.
Also Read : चहापान कार्यक्रम मोडल्याच्या रागातून मारहाण; लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याचा राग मनात धरून संशयित सुनील कोळी याचा भाऊ याने हातातील धारदार सुरीने डोक्यावर मारून दुखापत केली. राजाराम सावंत यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी तळवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान या मारहाणीत परस्परविरुद्ध आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हप्तेखोरीची जोरदार चर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र या मारहाणीनंतर व्हिडिओ व्हायरल झाला असून हप्ते वसूलीचा प्रकार ही उजेडात आला आहे. छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्यांकडून शहरातील दादा, भाईंकडून हप्ते वसुली केली जात असेल तर हे सर्व कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हातावर पोट असणाऱ्या रस्त्यावरील व्यवसायिकांना मारहाण करून कशा प्रकारे त्रास दिला जातो, हप्तेवसुली केली जाते याचे उदाहरण व्हिडिओच्या माध्यमांतून समोर आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी व्यवसायिक, नागरिकांमधून केली जात आहे. हप्ते गोळा करण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याची चर्चा आता जोरदार सुरू आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1