(राजापूर)
तालुक्यात रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट करीत जोरदार पाऊस कोसळला. तालुक्यातील कोंड्येतर्फ सौंदळ बेंद्रेवाडी येथे घरावर वीज पडल्याची घटना सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरातील रविना लवू बेंद्रे (वय १७) आणि सारिका रघुनाथ बेंद्रे (वय ४५) यांच्या हातापायांना दुखापती होऊन त्या जखमी झाल्या आहेत. घराच्या छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरातील वीज जोडणीही जळून खाक झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये तालुक्यात वीज पडण्याची ही तिसरी घटना घडली आहे. दरम्यान, वीज पडल्याची माहिती मिळताच उद्धव सेनेचे उपविभागप्रमुख आणि राजापूर अर्बन बँकेचे संचालक प्रसाद मोहरकर, शांताराम तळवडेकर, सरपंच मीनल तळवडेकर, आशिष लाड, संदीप शिवगण, प्रशांत राऊत, सूर्यकांत साळवी, संतोष तळवडेकर, हेमंत उपळकर, विजय आगटे, अजित बेंद्रे, मंगेश बेंद्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आपद्वस्तांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
रविवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान कोंड्येतर्फ सौंदळ येथे बेंद्रे यांच्या घरावर वीज पडली. घराच्या मागच्या पडवीच्या छपरातून वीज घरात आली. वीज पडली तेव्हा तेथे असलेल्या रविना आणि सारिका यांच्या हातापायांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तलाठी पिराई यांनी घराचा पंचनामा केला. राजापूरचे पोलिस उपनिरीक्षक उबाळे आणि सहकारी पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
३ गावांमध्ये वीज कोसळली
मागील काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये गत आठवड्यात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान झाले आहे. त्यात दोन ठिकाणी घरावर तर एका ठिकाणी चिरेखाणीत वीज पडली आहे.