( कळझोंडी / किशोर पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी गावातील शेतकरी कुटुंबातील महिला सौ. विजया विजय पवार यांच्या मालकीच्या बैलावर वाघाने हल्ला केल्याने बैल जागीच ठार झाला. या घटनेमुळे कळझोंडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या परिसरातील बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा,अशी आग्रही मागणी कळझोंडी गावाचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीपशेठ पवार, गावाचे उपसरपंच आयु. प्रकाशशेठ पवार सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार यांनी केली आहे.
कळझोंडी गावात गेल्या दोन-तीन वर्षात सुमारे १५ जनावरांना या परिसरात फिरणाऱ्या , बिबट्यांने हल्ला करून ठार केले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे .प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई लवकर मिळत नाही .मिळाली तरी ती अत्यल्प प्रमाणात मिळते, म्हणून एक तर जास्त प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी . तसेच इथून पुढे नुकसान होणार नाही याबाबत वनविभागाने काळजी घ्यावी. परिसरातील बिबटे यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कळझोंडी गावातून होत आहे.
कोळीसरे ,आगरनरळ , वरवडे परिसरात या बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या दोन-तीन वर्षात येथे बिबटे कोणी आणून सोडले की काय ?असा संशय येथील नागरिकांना पडला आहे .तरी याबाबत चौकशी करण्यात यावी ,अशी ही मागणी या भागातून जोर धरू लागली आहे