(रत्नागिरी)
शहरालगतच्या एका श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीतून बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई येथे बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हा सर्व प्रकाराची मुंबई पोलीसांकडून चौकशी केली जात असल्यामुळे रत्नागिरीत जोरदार उलटसुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जन्म दाखला देणारा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते. मोहम्मद इद्रीस इसाक शेख असे मुंबई पोलिसांकडून अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून शेख याला ३ ऑक्टोबर २0२४ रोजी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळ रत्नागिरीतील एका ग्रामपंचायतीतून जन्म दाखला दिल्याचे आढळले. त्याच्या जन्म दाखल्यावर जन्म १ मे १९८३ रोजी असा उल्लेख असून, उद्यमनगर पडवेकर कॉलनी, ता. जि. रत्नागिरी असा पत्ता आहे. तसेच आईचे नाव शाहीदा बेगम मोहम्मद इसाक शेख व वडिलांचे नाव मोहम्मद इसाक शेख असे टाकण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासामध्ये शेख याने खोटा जन्म दाखला तयार केल्याचे आढळले आहे. हा दाखला रत्नागिरीनजीकच्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीतून देण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत जन्म दाखला देणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाला चौकशीसाठी मुंबईत बोलावले आहे. त्याबाबतचे पत्र रत्नागिरीत दाखल होताच एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच हे कोण होते असा देखील सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.