(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड रहाटागरवाडी येथील हनुमान मंदिरानाजिकच्या केळकर नामक कुटुंबीयांच्या खाजगी विहिरीमध्ये पन्नास वर्षीय प्रौढाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. नंदकुमार भिवा मालप (वय वर्षे 50, राहणार मालगुंड ब्रह्मटेकवाडी) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदकुमार मालप हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास मालगुंड बाजारपेठेमध्ये आपल्या घरगुती वस्तू आणण्यासाठी गेले होते. यावेळी मालगुंड रहाटागरवाडी येथील हनुमान मंदिरानजीक असलेल्या केळकर कुटुंबीयांच्या खाजगी मालकीच्या विहिरीच्या बाजूने ते चालत येत असताना अचानकपणे त्यांचा तोल विहिरीमध्ये गेल्याने ते विहिरीत पडले. त्यानंतर याबाबत कोणालाही माहिती नव्हती. मात्र, नंदकुमार हे सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत घरी आलेले नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्यांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधाशोध सुरू केली. मात्र तरी देखील ते मिळून आलेले नाही.
त्यानंतर गुरुवारी सकाळच्या सुमारास पुन्हा शोधाशोध सुरू झाली असताना मालगुंड रहाटागरवाडी येथील केळकर नामक कुटुंबीयांच्या खाजगी मालकीच्या विहिरीत नंदकुमार हे विहिरीत पडल्याचे मालगुंड रहाटागरवाडी येथील काही स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची खबर मालगुंड रहाटकरवाडी येथील पोलीसपाटील निधी मांडवकर यांना दिली. त्यानंतर याबाबतची माहिती नंदकुमार मालप यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर सर्व कुटुंबीय आणि इतर सर्व स्थानिक ग्रामस्थ एकत्रित आले असता त्यांनी नंदकुमार हे विहरीत पडून बुडाल्याची पाहणी केली.
याबाबतची माहिती जयगड पोलीस ठाण्याला मालगुंड रहाटागरवाडी येथील पोलीसपाटील निधी मांडवकर यांनी दिली. त्यानंतर जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या मालगुंड -गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि संबंधित घटनेची माहिती घेतली असता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित विहिरीत पडलेल्या व्यक्तीला विहिरीबाहेर काढले त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीचे मालगुंड गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. या विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा पंचनामा झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, विहिरीत पडून मृत्यू झालेले नंदकुमार मालप हे अतिशय प्रेमळ व मनमिळावू होते. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र,त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मालगुंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा एक मुलगा आणि अन्य कुटुंबीय आहेत.