(परभणी)
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. हीट अँड रन, महिलांवरील अत्याचार असे अनेक गुन्हे सातत्याने राज्यभरात घडत आहेत. राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत? असा प्रश्न सध्या राज्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचारचे सत्र हे थांबताना दिसून येत नाहीये. परभणीमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. परभणीमधील एका शाळेत ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परभणीच्या सोनपेठ परिसरात हा प्रकार घडला आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ भागात एक इंग्रजी शाळा आहे. त्या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या ५ वर्षीय लहान मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण उजेडात येताच परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायदा आणि अन्य कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ८ पथकांची नियुक्ती केली आहे. पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून तपास वेगाने करताना पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एक मुलगी इंग्रजी शाळेत शिकत आहे. ५ तारखेच्या दरम्यान त्या मुलीला घरी आल्यानंतर सरळपणे बसता येत नव्हते. त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा, स्कूल बस, घाट रस्ते अशाच कोणत्याच ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान परभणीत घडलेल्या या प्रकारामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानुसार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत.