(गणपतीपुळे /वैभव पवार)
लहान वयामध्ये जर मुलांना त्यांच्या मातृभाषेमधून शिक्षण दिल्यास, त्यांना शिक्षणामधील नवनवीन बदल हे आत्मसात करायला सोपे जाते व त्यामुळे त्याच्या शिक्षणाचा दर्जा उंचावत असतो. म्हणून प्रत्येक पालकाने या सध्याच्या युगात आपल्या मुलाला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजेत असे मत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी कसल्याही पद्धतीची इंग्रजी वा इतर माध्यमाच्या शाळा किंवा इतर बोर्डांच्या सुद्धा शाळा नव्हत्या. तरीही आज समाजामध्ये अनेक जण आपापल्या पायावर स्वस्थपणे आणि परिपूर्णरित्या उभे आहेत. याची असंख्य उदाहरणे आपल्या परिसरात आढळतात. त्यामुळेच एखाद्या ठराविक माध्यमातून शिक्षण घेतल्यास मुलांचा सर्वांगीण विकास होतो हा समज प्रत्येक पालकांनी मनातून काढून टाकून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतच घातले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात अनेक शाळा ह्या शंभर ते दीडशे वर्षाच्या असून या सर्व शाळांचा खुप अभिमान वाटतो. म्हणूनच हे वैभव टिकविण्यासाठी पालक, ग्रामस्थ यांनी एकत्र येत शिक्षकांच्या मदतीने अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी घडवावे असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेला स्थापनेपासून एकसष्ट वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेची एकसष्टी साजरी करण्यात आली. या एकसष्टी च्या निमित्ताने शाळेचा जीर्णोद्धार सोहळा नुकताच अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांनी श्रीफळ वाढवून शाळेचे उद्घाटन केले. त्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या ऑफिस आणि संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख हस्ते झाले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजातील परिपूर्ण नागरिक होण्याच्या दृष्टीने प्रत्येकात सकारात्मक भावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगत प्रत्येकानेच शासकीय नोकरी वा इतर नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचा, स्वनिर्मित एखादा व्यवसाय करावा आणि तसे शिक्षण प्रत्येक शाळेतून दिले जावे असेही आवाहन त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गजानन पाटील यांनीही आपल्या मनोगतातून शाळेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सर्व मान्यवरांच्या समोर देत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राजेश जाधव आणि सागरी पोलीस ठाणे जयगडचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
याच जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त दुपारच्या सत्रात महिला मेळाव्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी महिलांना तर सायंकाळी रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, खासदार विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर सागर चव्हाण, रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती संजना माने, माजी सभापती ऋतुजा जाधव, माजी सभापती मेघना पाष्टे, ग्रुप ग्रामपंचायत वाटद सरपंच अंजली विभुते यांच्यासह माजी समाजकल्याण समिती सभापती शरद चव्हाण, क्रीडाशिक्षक राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते उदय माने, राजेश साळवी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाई जाधव, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, उपस्थित होते. यावेळी खंडाळा येथून जवळच असलेल्या रीळ गावचे सुपुत्र सागर चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीला पाच संगणक देणगी स्वरूपात प्राप्त करून दिल्याबद्दल शाळेच्या माजी विद्यार्थिनी सायली घवाळी, रिद्धी धोपट यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर दिवस या जीर्णोद्धार सोहळ्यादरम्यान संपूर्ण दिवसभरात माजी विद्यार्थी मेळावा महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ शाळेतून शिक्षण शिक्षण देऊन गेलेल्या सर्व शिक्षकांचा गुरु गौरव कृतज्ञता सोहळा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, देणगीदारांचा सत्कार, विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेत जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, वैशाली कुर्टे, महादेव धोपट, विश्वनाथ शिर्के, रमेश तांबटकर, प्रभाकर धोपट, महेश घवाळी, गोविंद डुमनर सर, राजेंद्र धनावडे, मारुती कुर्टे, अक्षरा शिर्के, अपूर्वा लाकडे, सचिन अजगोलकर, विजय तांबटकर, यांनी विशेष प्रयत्न केले.